अमृतफळ बेल / Bael fruit

बेल किंवा बिल्वचा अर्थ आहे : रोगान बिलति भिनत्ति इति बिल्व:| जे  रोगांचा नाश करते ते बिल्व. बेलाच्या विधिवत सेवनाने शरीर स्वच्छ व सुडौल बनते. बेलाचे मूळ, फांद्या , पाने ,साल आणि फळे – सर्व औषधी आहेत. बेलात हृदयाला शक्ति व मेंदूला स्फूर्ती देण्याबरोबरच सात्विकता प्रदान करण्याचाही श्रेष्ठ गुण आहे. बेलफळ स्निग्ध , मऊ  व उष्ण असते. याचा  गर , पाने व बियांमध्ये उडनशील तेल आढळते, जे औषधी गुणांनी ओतप्रोत असते. कच्च्या व पिकलेल्या बेळफळाचे गुण व त्यापासून होणारे लाभ वेगवेगळ्या प्रकारचे असतात.

कच्चे बेलफळ  भूक  व पचनशक्तिवर्धक तसेच कृमिनाशक आहे. हे मलाबरोबर वाहणाऱ्या जलयुक्त भागाचे शोषण करणारे असल्याने अतिसार रोगात  अत्यंत हितकर आहे. नियमित खाल्ल्याने कॉलऱ्यापासून रक्षण होते.

बेलाचे पिकलेले फळ गोड , तुरट , पचण्यास जड व मृदू विरेचक असते. याच्या सेवनाने शौचाला साफ होते.

औषधी – उपयोग :

  • उलटी : बेलफाळच्या सालीच्या ३० ते ५० मि. ली. काढा मधासोबत घेतल्याने त्रिदोषजन्य उलटीत आराम मिळतो. गर्भवती स्त्रियांना उलटी व अतिसार झाल्यावर कच्च्या बेळफळाच्या २० ते ५० मि. ली. काढयात सातूचे पीठ कालवून  दिल्याने आराम होतो. सतत उलट्या होत असल्यास आणि कोणत्याही उपचाराने आराम न मिळाल्यास बेलफळाच्या गऱ्याचे ५ ग्रॅम चूर्ण तांदळाच्या धूवणाबरोबर दिल्याने लाभ होतो.
  • ग्रहणी : या रोगात पचनशक्ती खूपच मंद होते. वारंवार दुर्गंधयुक्त चिकट जुलाब होतात. यासाठी दोन बेळफळांचा गर ४०० मि. ली. पाण्यात उकळून गाळून घ्यावा. मग थंड करून त्यात २० ग्रॅम मध मिसळून सेवन करावे.
  • पोटात मुरडा येणे (dysentery ) : बेलफळ आतड्यांना शक्ती देते. बेलाच्या गऱ्यातून बिया काढून सकळसायंकाळ तो गर खाल्ल्याने पोटात मुरडा येत नाही.
  • जळजळ : २०० मि. ली. पाण्यात २५ ग्रॅम  बेलफळाचा गर, २५ ग्रॅम खडीसाखर मिसळून सरबत प्यायल्यास छाती,पोट,डोळे किंवा पायाच्या जळजळीत आराम मिळतो.
  • तोंड येणे: एका बेलाचा गर १०० ग्रॅम पाण्यात उकळवा. थंड झाल्यावर त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
  • मधुमेह (Diabetise ) : बेल व बकुळीच्या सालीचे २ ग्रॅम चूर्ण दुधाबरोबर घ्यावे अथवा १५ बेलपत्र आणि ५ काळे मिरे वाटून चटणी करावी व एक कप पाण्यात कालवून प्यावी. हा प्रयोग दीर्घकाळ केल्याने मधुमेह कायमचा बरा होतो.
  • मानसिक थकवा : एका पिकलेल्या बेलाचा गर पाण्यात कालवून रात्रभर मातीच्या भांड्यात ठेवावा. सकाळी पाणी गाळून त्यात खडीसाखर घालावी. हा प्रयोग दररोज केल्याने मेंदू टवटवीत राहतो.
  • पाचन : पिकलेल्या बेलफळाचा गर काढून तो चांगला सुकवावा. नंतर वाटून चूर्ण तयार करावे. यात पंचकतत्वे समाविष्ट असतात. आवश्यकता पडल्यास २ ते ५ ग्रॅम चूर्ण पण्याबरोबर घेतल्याने पाचनक्रिया सुरळीत होते.