उत्सव अन् सण
पुलकीत करीती मन अन् मन |
सण उत्सव हे भारतीयांच्या सामाजिक जीवनाचे एक प्रमुख अंग आहे. भारतीय मग तो कोणत्याही प्रांताचा, भाषेचा आगर धर्माचा असो. कोणताही सण तो कौटुंबिक पातळीवरील धार्मिक विधीबरोबरच समूहात जाऊन उत्सवाच्या स्वरूपात साजरा करतो. मग तो पोंगल असो, ओणम असो, नवरात्र नाहीतर दिवाळी असो! किंवा ईद….
धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय असे सण – उत्सवांचे तीन प्रकारात विभाजन होते. धार्मिक सणांमध्ये व्यक्तीची मानसिक, आध्यात्मिक व नैतिक उन्नती साधली जाते. त्यागाचे, दानाचे, महत्त्व मनावर बिंबविले जाते. पराक्रमाचे, कर्तृत्वाचे पाठ दिले जातात. चांगली मूल्ये शिकवली जातात. समाजातील घटकांनी एकत्र येण्याच्या दृष्टीने सामाजिक सण साजरे केले जातात. मंगळागौर, हळदीकुंकू, दसरा, रंगपंचमी यांसारख्या सणांच्या दिवशी स्त्री पुरुष एकत्र येतात. त्यामुळे एकमेकांबद्दलची आपुलकी वाढते.
एकमेकांबद्दल जिव्हाळा, बंधुभाव वाढीस लागावा. श्रद्धांची जपणूक व्हावी यासाठी फार पूर्वीपासूनच सण, उत्सव साजरे केले जातात. टिळकांनी सुरू केलेले शिवजयंती व गणेशोत्सव हे सार्वजनिक उत्सव साजरे होतातच, शिवाय अनेक थोर नेत्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्यांचीही त्यात भर पडली आहे.
सण आणि उत्सवांचे आजचे स्वरूप बदलत चालले आहे. आज सण म्हणजे नवीन पोशाख करणे, गोडधोड करणे, कामाला, कर्तव्याला सुट्टी देऊन आराम करणे आणि सार्वजनिक उत्सव म्हणजेच वर्गणी गोळा करून एखादा चित्रपट दाखविणे. आजूबाजूच्या लोकांना होणाऱ्या त्रासच विचार न करता दिवसभर मोठ्याने ध्वनिवर्धक लावून त्यावर विचित्र अंगविक्षेप करून नृत्य करणे अशा कल्पना रूढ झाल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात कर्णकर्कश वाजणारे संगीत कानावर आदळू लागले, फटाक्यांच्या आतषबाजीने थकून भंगून आलेले लोक हैराण झाले, विद्यार्थ्यांना, वृद्धांना, आजारी माणसांना त्याचा त्रास जल की वाटत. हीच सण, उत्सव साजरी करण्याची योग्य पद्धत आहे का? असे सण साजरे करायचे का?
वास्तविक धार्मिक सण आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे आपली संस्कृती ही विविध सणांनी बहरली आहे. प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्रत्येक सणाला एक सांस्कृतिक सामाजिक मूल्य आहे.
संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा मार्ग शोधला. ‘एक गाव – एक गणपती’. हे तत्व स्वीकारून मनोरंजनातून लोककल्याणाकडे या तत्वाने गणेशोत्सव साजरा केला पाहिजे.
आपल्या देशात अनेक धर्म, पंथ असल्याने प्रत्येकाला सण साजरे करणे आवश्यक वाटते. हिंदूंचे जसे विविध सण, तसेच इतर धर्मियांचे ईद, मोहरम, इस्टर, गुडफ्रायडे, ख्रिसमस हे सण शिवाय बालदिन, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, बुद्धपौर्णिमा इ. सण आणि उत्सवांसाठी वर्षाचे ३६५ दिवस ही अपुरे वाटतील.
हे सण साजरे करण्यासाठी सुट्ट्या दिल्या जातात. म्हणजे कामाचे नुकसान होत आणि उत्पादनात खंड पडतो. सर्व सणांना सुट्ट्या देणे बंद करावे.
आज नव्या पिढीतील अनेक जन नव्या दृष्टिकोनातून सण उत्सवांचा विचार करू लागले आहेत. शक्ती आणि पैसा विधायक कार्याकडे वळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गणेशोत्सवातील मंडळांकडून जमलेला पैसा सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणला पाहिजे. गणेश विसर्जनाच्या वेळी रेकॉर्डस एवजी लेझिम पथके वापरावीत. होळीसारख्या सणाच्या वेळी झाडे तोडण्याएवजी वृक्षारोपण मोहीम राबवावी तरच खऱ्या अर्थाने सण साजरा झाला असे म्हणणे योग्य ठरेल.