सावित्रीबाई फुले निबंध / Savitribai Phule essay

     महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबरच सावित्रीबाई फुले यांचे नावही आदराने घेतले जाते. कारण स्त्री शिक्षणाच्या त्या आद्य क्रांतिकारक होत्या. एकोणविसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्या वेळी भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणाऱ्या या देशात स्त्रीला समाजात ‘चूल आणि मूल’ एवढेच स्थान होते, स्त्रीला समाजात कोणताही दर्जा नव्हता अशा वेळी तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी दिली.

     पुण्यात स्त्री शिक्षणाची सोय नव्हती. तेव्हा ज्योतीबांनी इ. स. १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मुलींच्या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिकाही मिळत नसत. तेव्हा ज्योतीबांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला व वाचायला शिकवले व तिची शिक्षिका म्हणून नेमणूक केली.

      सावित्रीबाईंना स्वतःचे अपत्य झाले नाही, पण सर्व दीनदलितांना व अनाथांना जवळ करून त्यांच्यावर सावित्रीबाईनी पोटच्या मूलाप्रमाणे प्रेम केले व त्यांना अनेक दुःखांपासून मुक्त करण्यासाठी, स्वतःच्या रक्ताचा थेंब व क्षण वेचला. सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली. सर्व टीका, छळ सहन करून एका  थोर सामाजसुधारकाची जीवनसहचरी म्हणून, धैर्याने वागून ज्योतिबांचे जीवन धन्य  करण्यास त्यांना सर्वतोपरी साह्य केले. सावित्रीबाईंना उत्तम शिक्षण मिळाले. त्या काळात स्त्रियांना शिकवले जात नसे. ज्योतीबांच्या वडिलांना असे वाटले की, त्यांच्या समजसुधारणेच्या कार्यामुळे धर्माला काळिमा लागेल. पण सावित्रीबाई  डगमगल्या नाहीत.  

       त्यांचा मानसिक आणि काही प्रमाणात शारीरिक छळ नातेवाइकांनी, समाजाने, सनातण्यांनी केला. रस्त्यातून जात असताना त्यांना लोकांकडून शिवीगाळ, त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे भिरकावण्यात आले, घरातील कचरा त्यांच्या अंगावर टाकण्यात आला. ही सर्व कृत्ये त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठीचे प्रोत्साहन असल्याचे वाटत असे.

        सावित्रीबाईंनी जे विचार मांडले, ते प्रत्यक्ष कृतीत आणले. शाळेमध्ये सावित्रीबाई मुख्याध्यापिका झाल्यावर त्या पवित्र ध्येयाने अध्यापनाचे काम करीत. सावित्रीबाईंचा मानसिक छळ नातेवाईकांनी, समाजाने व सनातण्यांनी केला. सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास समर्थ होत्या. त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे कारण विधवा. स्त्री ने संन्यासिनी सारखे जीवन जगावे अशी रूढी होती. स्त्रीला अपशकुनी समजले जात असे. तिला पांढरे वस्त्र परिधान करावे लागत असे.त्यांना घरातच कोंडून ठेवले जाई. सावित्रीबाईंनी स्त्रियांचे हे दु:ख जवळून पाहिले. केशवपनाची दुष्ट रूढी नष्ट झाली पाहिजे, असे त्यांनी ठरविले. तेव्हा सावित्रीबाईंनी सर्व न्हाव्यांची एक सभा बोलाविली आणि आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चलवितो, हे केवढे पाप आहे, याची जाणीव त्यांना करून दिली व त्यांना केशवपनास जाऊ नका असे सांगितले. न्हाव्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी संप पुकारला.     

         सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधकगृह सुरू केले. बाल-विधवांचे दुख: त्यांनी जाणले होते. इ. स. १८९३ साली सत्यशोधक समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते. त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या. तेव्हा त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले. सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह १८५० साली तर दुसरा काव्यसंग्रह १८९० साली प्रसिद्ध झाला. १० मार्च १८९७ साली पुण्याला प्लेगची साथ आली. सावित्रीबाईंनाही प्लेगने घेरले आणि या क्रांतिकारक स्त्रीने जगाचा निरोप घेतला. स्त्री ही मानव आहे आणि ती पुरुषांइतकेच काम करू शकते, हे त्यांनी स्वतःच्या कृतीने सिद्ध करून दखविले.